महापौर उषा ढोरे यांनी महापौर पदाची गरीमा घालवली, राजीनामा द्यावा

60

>> महिला काँग्रेस शहराध्यक्ष सायली नढे यांची मागणी

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा गैर अर्थ काढत व विपर्यास करत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज (मंगळवारी) आंदोलन केले. या दरम्यान शहराच्या महापौर उषा ढोरे यांनी अतिशय खालच्या भाषेचा वापर केला असून त्याचा महिला काँग्रेसने निषेध केला. महापौर उषा ढोरे यांनी महापौर पदाची गरीमा घालवली असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महिला काँग्रेस शहराध्यक्ष सायली नढे यांनी केली.

सायली नढे म्हणाल्या, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच केलेले वक्तव्य हे दुस-या व्यक्तिबाबत होते व तसे त्यांनी स्पष्ट केले असताना भाजपा चे कार्यकर्ते निर्रथक आंदोलन करताना राज्यभर दिसत आहेत. पिंपरीतील आंदोलना दरम्यान जे खालच्या पातळीचे वक्तव्य महापौर उषा ढोरे यांनी केले. त्यामुळे संपूर्ण शहराच्या व शहराचे प्रथम नागरीक असलेल्या मानाच्या महापौर पदाच्या प्रतिष्ठेला त्यांनी स्वतःच काळीमा लावला आहे. यापूर्वी सुध्दा महापौरांनी सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते.

महापौर ढोरे यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना पदावरून दूर करा अशी मागणी करत, त्यांना डांबरी रस्त्यावर आणून जोडे मारले पाहिजेत. त्यासाठी त्यांनी स्त्री या पुरेशा आहेत यात पुरूषांची गरज नाही असे अत्यंत चुकीचे वक्तव्य केले. हे जबाबदार पदावरील व्यक्तीचे प्रचंड चुकीचे वर्तन आहे याचा मी जाहीर निषेध करते. महापौर पद हे कोणत्याही एका पक्षाचे प्रतिनिधीत्व करत नसते. तर ते संपूर्ण शहरवासीयांचे नेतृत्व निष्पक्षपातीपणे करत असते असे लोकशाहीत अपेक्षित असताना, जे त्यांनी केले याबाबत महापौरांनी त्वरित माफी मागावी अन्यथा महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल”