महापालिकेबाबत काँग्रेसचा “हा” फॉर्म्युला ठरला

68

नागपूर, दि. १६ (पीसीबी) : काँग्रेसचे उदयपूरमध्ये तीन दिवसीय चिंतन शिबीर पार पडले. यामध्ये ‘एक कुटुंब-एक तिकीट’ हा फॉर्म्युला ठरविण्यात आला. हाच नियम आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये लागू करण्यात येईल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते.

काँग्रेससकडून देशात जनजागरण मोहीम केली जाणार आहे. त्याद्वारे काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. येत्या निवडणुकांमध्ये तरुणांना ५० टक्के जागा देण्यात येणार आहे. एका कुटुंबाला एकच तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा नियम लागू करणार आहोत. स्वातंत्र्यांनंतरचे ५० वर्ष काँग्रेसने देशाला महासत्ता बनविण्याचं काम केलं आहे. पण, मोदी सरकारने ८ वर्षात देशाला मागे आणले आहे. देश श्रीलंकेच्या वाटेवर आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाही. संविधान सुरक्षित राहिलेलं नाही. याबाबत गेल्या ३ दिवसांच्या चिंतना शिबारात चर्चा केली, असं नाना पटोले म्हणाले.

”भाजपने सत्तेसाठी धर्माचं बाजारीकरण केलंय” –
काँग्रेस हा एक विचार आहे. आम्ही सत्तेसाठी नको ते काम करत नाही. त्यामुळे आम्ही मोठे झालो आहोत. भाजप निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातो, तसा गैरवापर काँग्रेस करणार नाही. आम्ही विचाराने लढाई जिंकतो. देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांसोबत बोलायला तयार नाही. महागाई वाढत चालली आहे. भाजपच्या काळात नोकऱ्या गेल्या आहेत. भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा वापर केला जात आहे. माझ्या हिंदू धर्माचं राजकीयकरण करणं बरोबर नाही. माझा धर्म हे शिकवत नाही. भाजप सत्तेसाठी धर्माचं बाजारीकरण करत आहे, असा आरोप देखील पटोलेंनी केला.

नाना पटोले भाजपमधून आले आहेत. त्यामुळे आमच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका भाजपने करावी का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. त्यालाच आता पटोलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ”नाना पटोलेंचा इतिहास सर्वांना माहिती आहे. मी सत्तेसाठी लढणारा कार्यकर्ता नाही. माझ्या पार्श्वभूमीची चर्चा करण्याची गरज नाही. सत्तेत राहून गद्दारी करण्याचं काम नाना पटोलेंनी केलं नाही. जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी देशाला माहिती आहे”, असं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी अजित पवारांना दिलं आहे.
पक्षाच्या अंतर्गत निवडणुका सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील निवडणूक होणार आहे. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावे, अशी आमची भूमिका आहे, असं नाना पटोले म्हणाले.