महापालिका सभा व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घ्या – भाऊसाहेब भोईर

49

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घ्यावी, अशी मागणी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी महापौर माई ढोरे यांच्याकडे केली आहे.

पत्रात भोईर म्हणतात, कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन महिने बंद आहे. राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू झाल्यामुळे जवळ जवळ सर्व अधिकार पुणे जिल्हा कलेक्टर आणि महानगरपालिका आयुक्तांकडे गेलेले आहेत. प्रशासनाकडून करोना साथीसंदर्भात घेतले जाणाऱ्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. शहरातील डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस प्रशासनाचे एथक प्रयत्न आहेत. अशात महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी अद्याप झालेली नाही. यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. याचबरोबर गेल्या दोन महिन्यांपासून महानगरपालिका क्षेत्र जवळ जवळ संपूर्णपणे बंद असल्यामुळे, मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण चालू नसल्यामुळे पालिका क्षेत्रातील संपूर्ण जनता आर्थिक विवंचनेत सापडली आहे. नागरिक महानगरपालिकेच्या करसंकलनात सूट मिळावी म्हणून मागणी करत आहेत.

कोरोना साथीमुळे महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झालेले आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोकप्रतिनिधींचे अभिप्राय घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी फक्त आर्थिक संकटाच्या मुद्यावर कायदेशीररित्या नियोजनबद्ध महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोना साथीच्या काळात सामाजिक अंतर राखणे महत्वाचे असल्यामुळे सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली जाऊ शकते. त्यात हि तांत्रिक कारणांमुळे काही अडथळे निर्माण होत असल्यास, आपण शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी. यामुळे सध्या लागू असेलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन होईल आणि महानगरपालिकेला येऊ घातलेलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल, असे भोईर यांनी म्हटले आहे.

WhatsAppShare