महापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदल्या रखडल्या

59

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. महिन्याभरापासून शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची केवळ चर्चाच सुरु आहे. पण, प्रत्यक्षात बदल्या झाल्या नाहीत. एकेका शाळेवर 15 ते 20 वर्ष ठाण मांडून बसलेल्या शिक्षकांची मक्तेदारी वाढली आहे.

महापालिका शिक्षकांच्या बदल्या विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरतात. सन 2018 पासून तत्कालीन आयुक्तांनी परिपत्रक काढून प्रशासकीय बदली प्रक्रिया कशी राबवावी, याचा निर्णय दिलेला आहे. पण, प्राथमिक शिक्षण विभागाकडून गेल्या तीन वर्षांपासून निव्वळ बदल्यांसंदर्भात परिपत्रक काढले जाते. प्रत्यक्षात यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया राबवली जात नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सोनवणेवस्ती शाळेला चार वर्षापासून प्रभारी मुख्याध्यापकच आहेत. त्याप्रमाणेच बऱ्याच शाळेत शिक्षक संख्या कमी आहेत. तर, काही ठिकाणी शाळेत अतिरिक्त शिक्षक आहेत. 21 शाळा मुख्‍याध्यापिकाविना असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

तीन वर्षाच्या निकषांनुसार केवळ 30 टक्के बदलीपात्र शिक्षकांची संख्या 300 हून अधिक आहे. प्रशासनाने या शिक्षकांची यादी तयार करणे आवश्‍यक आहे. अनेक शाळांमध्ये तीन, पाच व 15 वर्ष झालेल्या शिक्षकांची मक्तेदारी वाढलेली आहे. शिक्षक बायोमेट्रिक हजेरी लावतात आणि गायब होतात, असे चित्र आहे. त्याचा थेट परिणाम शाळेच्या गुणवत्तेवर झाला आहे. शिक्षक बदलल्याशिवाय शाळा सुधारणार नाहीत, असा पूर्वानुभव आहे. परंतु, तीन वर्षांपासून बदल्या होत नसल्याने काही शिक्षकांचे चांगलेच फावले आहे. या निकषानुसार तरी बदल्या करायला हव्यात, अशी मागणी शिक्षक करू लागले आहेत.