महापालिका निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीच्या जोर बैठका

288

– काँग्रेस फक्त चाचपणी तर रिपाई, वंचितची नविन समीकरणाची तयारी

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक अवघ्या सात महिन्यांवर (फेब्रुवारी २०२२) येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेषतः महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन संपर्क अभियानातून आतापासूनच आघाडी घेतली आहे. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अद्याप फक्त चर्चा व हालचाली सुरू आहेत, मात्र शिवसेनेने पदाधिकाऱ्यांचा एक जंगी मेळावा घेऊन शड्डू ठोकला आहे. काँग्रेस पदाधिकारी आपल्याला महाआघाडी करून की स्वतंत्र लढायचे याबाबतच मोठा संभ्रम असल्याने त्यांनी फक्त चाचपणी सुरू केली आहे. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची संयुक्त बैठक घेत बिगूल वाजवले, तर रिपाई (आठवले) गटानेही मंगळवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत जोर बैठका सुरू केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कायम वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ च्या निवडणुकित सत्तांतर झाले. राष्ट्रवादीतील काही नेते आणि अनेक आजी-माजी नगरसेवक फुटून भाजपामध्ये सामिल झाले आणि अजित पवार यांना अत्यंत दारूण पराभव केला. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या जोडगोळीने हा चमत्कार घडवून आणला. आज या दोघांचीही शहराच्या राजकारणावरची पकड कायम असल्याने भाजपा निश्चिंत आहे. मात्र, राज्यात शिवेसना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असल्याने अजित पवार यांनी आता नव्या दमाने गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी व्युहरचना आखली आहे. त्यासाठी दादांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याचे दिसते. त्याचाच भाग म्हणून पार्थ पवार हे वारंवार महापालिकेत येत असतात. भाजपामधील सुमारे २५-३० नाराज नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याबाबत छुपी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीने निवडणूक तयारीचा भाग वार्ड रचना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांशी संपर्क वाढवला आहे. सत्ता मिळवायचीच असा चंग राष्ट्रवादीने बांधला असून जुने चेहरे बाजुला सारून नवीन फळी पुढे करायचा प्रयत्न आहे. पदाधाकारी नियुक्त करताना त्या पद्धतीने निवड करण्यात येते आहे. नजिकच्या काळात पक्षाचे शहराध्यक्ष बदलाचीही शक्यता वर्तविण्यात येते आहे. पाच वर्षे क्वचित फिरकणारे अजित पवार आता शहरात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने वारंवार येत असल्याने राष्ट्रवादीतही हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीला गेल्यावेळी एकूण ८ लाख ८९ हजार ३४५ मते मिळाली आणि ३६ जागा जिंकल्या होत्या. आता महआघाडी असण्याची शक्यता असून गतवळी शिवसेनेला मिळालेली ५ लाख १६ हजार ८६० मते आणि ९ नगरसेवक अशी बेरीज राष्ट्रवादीत सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५७ आणि शिवेसनेचे २४ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते, तिथेही विशेष लक्ष केंद्रीत करायचे अशीही राष्ट्रवादीची व्युहरचना आहे.

भाजपाची संपर्क अभियानातून आघाडी –
भाजपाने महापालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी आता पूर्ण जबाबदारी दोन्ही आमदारांवर सोपविली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी अंग झटकून संपर्क अभियान गेल्याच आठवड्यात सुरू केले. जुन्या पदाधिकाऱ्यांपैकी पूर्वीची बारामती लोकसभा दोन वेळा लढलेल्या तत्कालिन भाजपा उमेदवार डॉ. प्रतिभा लोखंडे यांच्याशी निवासस्थानी भेट घेऊन आमदार लांडगे यांनी संपर्क अभियानाचा शुभारंभ केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याही गाठीभेठी सुरू आहेत. भाजपाचे मुंबई शहराद्यक्ष आशिष शेलार यांचा आजचा (बुधवार) पिंपरी चिंचवड शहर दौरा हा निवडणूक तयारीचाच भाग आहे. शेलार यांची भाजपा पदाधिकारी, मंडल प्रमुख, कार्यकर्ते यांच्या बरोबर बैठक, नंतर पत्रकार परिषद, सावरकर सदन, भार्गव सदन, चापेकर स्मारक भेट तसेच दुपारी आमदार जगताप यांच्या निवासस्थानी आणि रात्री आमदार लांडगे यांच्या घरी भोजन असा भरगच्च कार्यक्रम आहे. नजिकच्या काळात अन्य नेते मंडळींचेही दौरे भाजपाने आखले असून भाजपाचे तसेच पाठिंबा देणारे अपक्ष फुटून राष्ट्रवादीत जाऊ नयेत यासाठीही प्रयत्न आहेत. भाजपाला गतवेळी ७८ जागा मिळाल्या आणि ११ लाख ५३ हजार ८५४ मते मिळाली होती. यावेळी तोच आलेख कायम ठेवण्यासाठी भाजपाची मोर्चेबांधनी आहे. गतवेळी ३९ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, ते विचार घेऊन १०० चा आकडा पार करायचाच, असे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे.

मनसे, काँग्रेस, रिपाई ची तयारी –
राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचा महापालिकेत एकही नगरसेवक नाही. गेल्यावेळी ६५ जागा लढविल्या आणि ९७ हजार ७१ मते घेतली. त्यावेळी ४५ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असून राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही त्यांना हिरवा कंदिल दर्शविला आहे. आता किमान मागच्यावेळेपेक्षा चांगली कामगिरी करत महापालिकेत किमान खाते खोलायचे आव्हान काँग्रेसवर आहे. अद्याप काँग्रेसचे शहरातील कार्यकर्ते चाचपणी करत असून स्वतंत्र लढायचे तर ते आव्हान कसे पेलायचे या विवंचनेत नेते आणि पदाधिकारी पडले आहेत. प्रदेशचे नेते पिंपरी चिंचवडकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याने काँग्रेसची शहरात तशी खूप वाताहत झाली असून पक्षाचे शहराध्यक्ष सचिन साठे यांची परिक्षा आहे.

मनसेचा महापालिकेत फक्त एक नगरसेवक आहे. २०१२ मध्ये ४ नगरसेवक होते. आता किमान १५-२० नगरसेवक निवडूण येतील अशी व्युहरचना सुरू आहे. मनसे पदाधिकाऱ्यांची एक बैठक नगरसेवक सचिन चिखले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. गेल्याच आठवड्यात मनसे नेते राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे शहरात एक बैठक पार पडली, त्यावेळी पिंपरी चिंचवडकडे लक्ष असल्याचे ठाकरे यांना अवर्जून नमूद केले. २०१७ मद्ये मनसेला एकूण ४३ हजार ४६ मते होती आता त्यात किमान दहा पट वाढ कशी करता येईल यासाठी पक्षाची तयारी सुरू आहे.

रिपाई, वंचित, बसपा एकच उमेदवार देणार –
रिपाई (आठवले) गटाने गेल्या निवडणुकित १६ जागा भाजपाकडे मागितल्या होत्या, पण अवघ्या तीन मिळाल्या आणि वाल्हेकरवाडी-रावेत ची एक जागा जिंकली. भाजपाने मनापासून साथ दिली नाही, असा रिपाई नेत्यांचा आक्षेप आहे. रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपा बरोबरच याहीवेळी निवडणूक लढणार असल्याचे सांगितले, पण जागा वाटपात सन्मानाची वागणूक मिळाल्यास ठिक अन्यथा वेगळा विचार करू अशी शहरातील रिपाईच्या काही नेत्यांची भूमिका आहे. दरम्यान, निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी आता रिपाई नेतृत्वात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत असून आठवले यांच्या आदेशानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी एक बैठक घेऊन त्यादृष्टीने चर्चा केल्याचे समजते. रिपाई, वंचित, बहुजन समाज पक्ष अशा सर्वांनी एकत्र येऊन भाजपा आणि शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या विरोधात एकच उमेदवार उभा करायचा, असा प्रयत्न असल्याचे रिपाईच्या प्रदेश सरचिटणी चंद्रकांता सोनकांबळे यांनी पीसीबी कट्टाच्या मुलाखतीत सांगितले.