महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार

141

पिंपरी, दि. १० (पीसीबी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या अंतिम प्रभाग रचनेचे काम उद्या बुधवारी पूर्ण करून गुरुवारी प्रभाग रचनेच्या अंतिम प्रस्तावास आयोगाची मान्यता घ्यावी. प्रभाग रचनेच्या मराठी, इंग्रजी प्रती आयोगाच्या स्वाक्षरीसाठी पाठवाव्यात. अंतिम प्रभाग रचना 17 मे 2022 पर्यंत जाहीर करावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी महापालिका आयुक्त यांना आज (मंगळवारी) दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. प्रारूप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता 28 जानेवारी 2022 रोजी देण्यात आली. प्रारुप प्रभाग रचना 1 फेब्रुवारी 2022 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली. प्रारुप प्रभाग रचनेवर 1 ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हरकती व सूचना मागविण्यात आल्या. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत 17 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत सुनावणी देण्यात आली. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशी नमूद केलेला अहवाल महानगरपालिकेमार्फत राज्य निवडणूक आयोगास 5 मार्च 2022 पर्यंत सादर करण्यात आला.

महानगरपालिकेने सादर केलेल्या अहवालाची तपासणी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सुरु असताना 11 मार्च 2022 रोजी शासनाने प्रभाग रचनेच्या अनुषंगाने अधिनियमात दुरुस्ती केल्यामुळे त्याबाबत आयोगाने पुढील कार्यवाही थांबविली होती. शासनाने अधिनियमात केलेल्या सदर दुरुस्तीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या. या सर्व याचिका विशेष अनुमती याचिका (सिव्हील) सोबत संलग्न करुन त्यावर सुनावणी झाली. त्यामध्ये 4 मे रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने, आयोगाने 10 मार्च, 2022 रोजी ज्या टप्प्यावर निवडणुकांची प्रक्रिया स्थगित केली होती, तेथून पुढे सुरुवात करुन निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

ही वस्तुस्थिती विचारात घेता प्रभाग रचनेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात 6 ते 10 मे 2022 या कालावधीत उपस्थित राहून अंतिम प्रभाग रचना प्रसिध्दीच्या अनुषंगाने उर्वरित कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्व शिफारशींचा सखोल अभ्यास करून आयोगाने आता 14 महानगरपालिकांच्या प्रभाग रचना अंतिम केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.