महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मु्ख्यमंत्र्याकडे मागणी

447

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये ध्वनी प्रदुषण आणि वायु प्रदुषण अति प्रमाणात होत आहे. महापालिका आयुक्तांना वारंवार सुचना देऊनही कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अपना वतन संघटनेचे शहर संपर्क प्रमुख हरिश्चंद्र तोंडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिकेच्या महापौर, स्थायी समिती व इतर समितीच्या निवडणुकीनंतर माहापालिका आवारात कार्यकर्त्यांकडून विनापरवाना ढोल-ताशा वाजवून सरकारी कर्मऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करतात. तसेच जेसीबी, जीप यांसारखे वाहने बेकायदेशीरपणे आणून वाहतूकीस अडथळा निर्माण केला जातो.

दरम्यान, ४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या निवडणुकीनंतर महापालिकेच्या आवारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर हौदोस घातला गेला. परंतू, महापालिका आयुक्त राजकीय दबावाला बळी पडत असून अशा बेकायदेशीर कृत्याला समर्थन देत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.