महापालिका आयुक्तांचं आवाहन; ‘नागरिकांनो अर्थसंकल्पासाठी दहा लाखांपर्यंतची कामे सूचवा’

64

पिंपरी, दि.०२ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन 2022-2023 या आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. महापालिकेच्या वतीने नव्या वर्षांचे अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अर्थसंकल्पात नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश केला जातो. त्यानुसार नागरिकांनी त्यांच्या क्षेत्रीय कार्यालय किंवा प्रभागातील कामे सुचवावी. गरजेनुसार आवश्यक व योग्य कामांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात येतो. नागरिकांनी दहा लाख खर्चा पर्यंतची कामे सूचवावित.

पदपथ, सायकल मार्ग, रस्ता डांबरीकरण, रस्ता दुभाजक, दुरुस्ती, बसस्थानक, माहितीफलक, नामफलक, बैठक व्यवस्था, रस्त्यावरील दिवे, वाहतूक दिवे, इमारत दुरुस्ती, सार्वजनिक वाचनालय, पाणीपुरवठा ड्रेनेज, स्मशानभूमी, विर्सजन घाट, आरोग्य निरीक्षक केबिन, शौचालय, मुतारी कचराकुड्यां अशी कामे नागरिकांनी सुचवावित.

नागरिकांच्या सूचना अर्ज 20 डिसेंबर सायंकाळी पाचपर्यंत संबंधित क्षेत्रीय कार्यालय किंवा ई-मेलवर स्वीकारण्यात येणार आहेत. संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंता हे सुचविलेल्या कामांची शहानिशा करून विकासकामांचा समावेश अर्थसंकल्पात करतील, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी. नागरिकांनी अर्थसंकल्पासाठी चांगल्या कामांची सूचना पाठवावी, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

दहा लाख खर्चापर्यंतची कामे नागरिकांना सुचविता येणार आहेत. पुल, उड्डाणपुल, नवे रस्ते, भवन, बांधकाम अशी मोठी कामे सुचविता येणार नाहीत. नागरिकांनी कामाचे स्वरूप व स्थान अचूकपणे लिहावे. कामानुसार अर्जातील रकाने भरावे. अर्ज भरण्याआधी क्षेत्रीय कार्यालय किंवा सारथी हेल्पलाईनवर (8888006666) संपर्क साधावा.