महाडमध्ये सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी

78

मुंबई, दि.७ (पीसीबी) – कोकणात मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महाड शहराजवळील गांधारी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे महाड शहराकडे येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर पावसामुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सध्या मोसमी पावसाने जोर धरला असून महाडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गांधारी पूल पाण्याखाली गेला असून शहराकडे येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. भाजी मंडई, दस्तुरी भागात पाणी भरण्याची शक्यता असून सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, कोकणात १० जुलैपर्यंत आणि विदर्भात ८ जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या कोकण, घाटमाथा आणि विदर्भात दमदार पाऊस पडत असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.