महाजनांनी आमच्या मित्राचा धुव्वा उडवला- आण्णा हजारे

1135

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – जळगाव महापालिका निवडणुकीत सुरेश जैन यांचा पराभावाबद्दल ज्येष्ठ समाजसेवर अण्णा हजारे यांनी आज जलसंपदा मंत्री डॉ. गिरीष महाजन यांचे कौतुक केले. जैन यांचे नाव न घेता ‘महाजनांनी जळगावमध्ये आमच्या मित्राचा धुव्वा उडविला’ अशा शब्दांत अण्णांनी भावना व्यक्त केल्या. तर त्याला हसत हसत उत्तर देत ‘अण्णा आम्ही एका दगडात दोन पक्षी मारले.’ असे महाजन म्हणाले.

हजारे यांनी २ ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा करून सरकारची बाजू मांडण्यासाठी महाजन आज राळेगणसिद्धीमध्ये आले आहेत. हजारे आणि महाजन या दोघांत अनेक विषयांवर बंद खोलीत चर्चा झाली. मूळ विषयाला सुरवात होण्यापूर्वी अन्य गप्पा सुरू असताना जळगावचाही विषय निघाला. त्यामध्ये हे राजकीय भाष्य झाले. जळगावमध्ये अलीकडेच झालेली निवडणुकीत महाजन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने जिंकली आहे. तेथे सुरेश जैन यांच्यासोबत माजी मंत्री एकनाथ खडसे यंचाही पराभव झाला आहे. पूर्वी सुरेश जैन आणि हजारे यांच्यात वाद झाले होते. परस्परांविरूदध कोर्टात खटलेही दाखल झाले. त्यांचे हे वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आज महाजन समोर येताच हजारे यांच्या तोंडून जैनांच्या पराभवाचा विषय बाहेर पडला. त्यानंतर महाजन यांनीही नाव न घेता खडसे यांच्या पराभवाचाही उल्लेख केला.