महाआघाडीला घाबरू नका, त्यांच्यावर कशी मात करायची हे माझ्यावर सोडा – अमित शहा

348

मेरठ, दि. १२ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या होणाऱ्या महाआघाडीला घाबरू नका, विरोधकांवर कशी मात करायची हे माझ्यावर सोडा. त्याची चिंता तुम्ही करू नका’, असे सांगून ‘२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ मध्ये एक तरी जादा जागा जिंकून दाखवणारच’, असा निर्धार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (रविवार) येथे केला. 

उत्तर प्रदेशात भाजप कार्यसमितीच्या चिंतन बैठकीत अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशात महाआघाडीचे मोठे आव्हान असल्याचे बोलून दाखवले. त्यावर शहा यांनी ‘तुम्ही महाआघाडीची चिंता करू नका. तुम्ही फक्त योगी आदित्यनाथ सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करा. बाकी मी पाहून घेतो’, असे शहा म्हणाले.

उत्तर प्रदेशात बसपा, काँग्रेस आणि सपा या सर्वांना आपण पराभूत केले होते. २०१७ मध्ये आपण निवडणुका लढलो, त्यावेळी दोन मुलांनी हातमिळवणी केली होती. मात्र, तरीही आपण ३०० हून अधिक जागा जिंकलो. यावेळी तिघेजण एकत्र आले तरी आपण ७४ पेक्षा कमी जागा जिंकणार नाही’, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.