मशिदीमधील शक्तिशाली बॉम्बस्फोटात ४६ हून अधिक नागरिक ठार

222

काबूल, दि. ९ (पीसीबी) : अफगाणिस्तानातील कुंडुझ प्रांतात शिया मुस्लिमांच्या मशिदीमध्ये शुक्रवारी घडविण्यात आलेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात ४६ हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. त्याशिवाय १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (आयएस) घेतली आहे.

शिया मुस्लिमांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले करण्यासाठी आयएस कुख्यात आहे. त्यामुळे हा हल्ला आयएसनेच घडवून आणला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. स्फोटाच्या काही तासानंतर आयएसशी संबंधित असलेल्या एका वृत्तसंस्थेने कुंदुज प्रांतातील मशिदीत दुपारी नमाजावेळी झालेल्या स्फोटाची जबाबदारी आयएसने घेतली असल्याचे म्हटले.

कुंडुझमधील गोझर-ई-सायेद आबाद मशिदीमध्ये शुक्रवारचा नमाज सुरू असताना आत्मघातकी हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला. बॉम्बस्फोटानंतर परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. मशिदीच्या पायऱ्यांवर सर्वत्र रक्त पसरले होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हा हल्ला उइगर मुस्लिमाने केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिया मुस्लिम आणि तालिबान या दोन्हींना या आत्मघाती हल्ल्यातून लक्ष्य करण्यात आले.