मशिदीत 40 जण नमाज पठणसाठी एकत्र आले अन्…

239

सांगली, दि. १४ (पीसीबी) : कोरोनाचा सर्वनाश करण्यासाठी प्रशासन आणि सरकार प्रचंड मेहनत घेत आहे. मात्र, तरीही काही नागरिक परिस्थितीला अजूनही गांभिर्याने घेताना दिसत नाही. सांगलीच्या मिरजेतील एका मशिदीत 40 जण नमाज पठणसाठी एकत्र आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तर संगमनेरमध्ये निजामुद्दीनमधील मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 14 परदेशी तब्लिगींना आश्रय देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाचा विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नागरिकांना घरात राहूनच प्रार्थना किंवा नमाज पठण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, तरीही राज्यातील काही धार्मिक स्थळांर गर्दी केली जात असल्याचं समोर येत आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजेत एका मशिदीमध्ये नमाज पठणसाठी 40 जण एकत्र आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सांगली जिल्ह्यात संचारबंदीमुळे कडकडीत बंद पाळला जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र, मिरजेत एका मशिदीमध्ये नमाज पठणसाठी 40 जण एकत्र आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नमाज पठण झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतलं. यावेळी काही लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांनादेखील पकडलं.

दूसरीकडे दिल्लीच्या निजामुद्दीनच्या मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या 14 परदेशी तब्लिगींना संगमनेरच्या इस्लापुरा मशिदीत आश्रय देण्यात आलं. याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे 14 तब्लिगी नेपाळ आणि इतर देशांचे नागरिक आहेत. याप्रकरणी हाजी जलीमखान पठाण, हाजी जियाबुद्दीन शेख, हाजी जैनुद्दीन परावे, हाजी जैनुद्दीन मोमी , रिजवान शेख या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पाचही जण संगमनेरच्या मोमीनपुरा येथील रहिवासी आहेत.