मल्टिप्लेक्स चालक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला ‘कृष्णकुंजवर’

31

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – मल्टिप्लेक्स चालकांनी आज (शनिवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मल्टिप्लेक्समध्ये सिनेमाच्या मध्यंतरादरम्यान मिळणारे खाद्यपदार्थ महागच नाही तर अवाजवी किंमतीचे असतात. यासाठीच मल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसेने आंदोलन सुरु केले आहे.

पाण्याची बाटली, पॉपकॉर्न, समोसा अशा पदार्थांचे दर सामान्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये नसतात त्यामुळे मनसेने हे आंदोलन राज्यभरात सुरु केले. या आंदोलनासंदर्भात उच्च न्यायालयात जाऊनही मल्टिप्लेक्स चालकांना कोणताही दिलासा मिळाला नाही, त्यामुळे या चालकांनी आज कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.

दरम्यान मल्टिप्लेक्स चालकांनी चहा-कॉफी, वडा-समोसा आणि पॉपकॉर्न यांचे दर ५० रूपयांपर्यंत कमी करावेत अशी मागणी मनसेने केली आहे. त्यावर ही मागणी मान्य करण्याची तयारी मल्टिप्लेक्स चालकांनी दर्शवली आहे. हे दर येत्या दोन ते तीन दिवसात कमी न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशाराही मनसेने दिला आहे. राज्यातील सगळ्या मल्टिप्लेक्सचे सीईओंनी राज ठाकरेंची भेट घेतली.

मध्यंतरी मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर राज्य सरकारचे नियंत्रण नाही का? ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रूपयात विकण्याचा अधिकार कोणी दिला?, असे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारले होते. काही दिवसांपूर्वी मनसेने पुण्यातील एका मल्टिप्लेक्समध्ये मनसे कर्मचाऱ्यांनी केलेले खळ्ळ खटॅक आंदोलन गाजले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मल्टिप्लेक्स चालकांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे.