मला भारताकडे सोपवल्यास आत्महत्या करीन-  नीरव मोदी

0
855

लंडन, दि. ७ (पीसीबी) – मला भारताकडे सोपवल्यास आत्महत्या करीन, असे पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी आणि हिरेव्यापारी नीरव मोदीने ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टात सांगितले. यावेळी कोर्टाने त्याचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळून लावला. मला तीन वेळा तुरुंगात मारहाण करण्यात आल्याचा दावाही त्याने केला. मात्र, त्याने केलेल्या या बतावणीचा न्यायाधीशांवर काहीही परिणाम झाला नाही. याउलट पुन्हा एकदा त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी बुधवारी वेस्टमिन्स्टर येथील कोर्टात वकील हुगो कीथ यांच्यासोबत आला होता. जामीनासाठी त्याने पाचव्यांदा अर्ज केला होता. पीएनबी संबंधित प्रकरणात भारताकडे प्रत्यार्पण करण्यासंबंधीचा खटला तो लढत आहे. नीरवला वेंड्सवर्थ तुरुंगात दोनदा मारहाण झाली. तसेच मंगळवारीही त्याला मारहाण झाली असा दावा त्याचे वकील कीथ यांनी कोर्टात केला.

कीथ यांनी सांगितले की, ‘काल, मंगळवारी सकाळी साधारण नऊ वाजल्यानंतर अन्य दोन कैदी नीरच्या सेलमध्ये गेले. त्यांनी दरवाजा बंद करून घेतला आणि नीरवला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नीरव त्यावेळी फोनवर बोलत होता. हा हल्ला कटाचा भाग होता. त्याला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले होते.’ नीरव मोदीचा वैद्यकीय अहवाल लीक झाल्याचा उल्लेख करत कीथ यांनी ही घटना सांगितली. तुरुंग अधिकाऱ्यांनी या घटनेनंतर कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा त्यानं केलेली विनंतीही धुडकावून लावण्यात आली, असेही कीथ यांनी सांगितले.

नीरव मोदीचा उल्लेख माध्यमांमध्ये ‘कोट्यधीश हिरे व्यापारी’ असा होत राहिला तर यापुढील काळातही त्याच्यावर अशाच प्रकारे हल्ले होतील, असे कीथ म्हणाले. यावेळी नीरवने आत्महत्येची धमकी दिली. मला भारताकडे सोपवले तर मी स्वतःला संपवेल, असे तो म्हणाला. भारतात निःष्पक्ष सुनावणी होईल अशी अपेक्षा नाही, असेही त्याने सांगितले. नीरवच्या या बतावणीचा कोर्टावर काहीही परिणाम झाला नाही. त्याचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळून लावण्यात आला. दरम्यान, नीरवला मार्चमध्ये अटक झाल्यानंतर वेंड्सवर्थ तुरुंगात ठेवण्यात आले आहे. भारत सरकारच्या विनंतीनंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली होती. नव्याने केलेला जामीन अर्ज फेटाळून लावल्याने नीरव मोदीला मोठा दणका बसल्याचे मानले जात आहे.