मला बदनाम करण्यामागचा मास्टरमाईंड एक मंत्री – एकनाथ खडसे

171

जळगाव, दि. १४ (पीसीबी) – अंजली दमानिया केवळ एक प्यादे असून मला बदनाम करण्यामागचा मास्टरमाईंड राज्यातील एक मंत्री आहे. त्याला उघड्यावर आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तो किती तरी मोठा असला तरी त्याच्याविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देणार आहे, असा गौप्यस्फोट माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भुसावळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खडसे म्हणाले की, माझ्या संपत्तीची चौकशी लावण्यासाठी दमानिया यांनी चोपडा अर्बन बँकेचा माझ्या नावे असलेला ९ कोटी ५० हजार रुपयाचा धनादेश बनावट असल्याचे समोर आले आहे. बँक अवसायनात गेल्याने रिझर्व्ह बँकेने १ हजार रुपयांच्यावर व्यवहार करण्यास बँकेला निर्बंध घातले आहेत. कदाचित ते धनादेश खरे असते, तर मला तुरुंगात जावे लागले असते, असे खडसे म्हणाले.

या प्रकरणात तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुपेकर यांनीही धनादेश  बनावट असल्याचे एलसीबीच्या तपासाअंती सांगितले होते. तरीही संबंधितावर गुन्हा दाखल केला जात नव्हता. याबाबतच्या सर्टिफाईड कॉप्या देऊनही मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. सध्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही पोलीस याप्रकरणात  टाळाटाळ करीत असल्याचे म्हटले होते, असे खडसे यांनी सांगितले.