“….मला पवार साहेबांशी बोलावं लागेल” – छगन भुजबळ

90

नाशिक, दि. २५ (पीसीबी) : अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या वादात उडी घेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळं छगन भुजबळ नाराज झाले आहेत. भुजबळ यांनी अत्यंत संयमी भाषेत आज ही नाराजी व्यक्त केली. नांदगाव विधानसभा मतदारसंघाबाबत केलेल्या राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचाही भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदारसंघात काल शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात संजय राऊत यांनी नेहमीच्या स्टाइलनं फटकेबाजी केली. राऊत यांनी भुजबळ यांना थेट इशाराही दिला. ‘आम्ही सरकार स्थापन केलं नसतं तर तुम्ही पालकमंत्री कसे झाला असता? आता नांदगावचा नाद सोडा. इकडं फार लक्ष घालू नका. आज नाशिकला लाल दिवा आला, उद्या नांदगावला आणू’ असा इशारा राऊत यांनी दिला होता. साहित्य संमेलनाच्या संबंधी माहिती देण्यासाठी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ यांना त्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी भुजबळ यांनी हातचं राखून न ठेवता राऊत यांना उत्तर दिलं.

‘नांदगावबद्दल राऊत काय बोलले हे माहीत नाही. ते कुठल्या आवाजात बोलतात, त्यावरून त्यांच्या वक्तव्याचे अर्थ बदलतात. पाहुणचार, देवाणघेवाण होत असते. खरं तर संजय राऊत हे शरद पवारांप्रमाणेच महाविकास आघाडी सरकारचे एक शिल्पकार आहेत. या शिल्पावर ओरखडा उमटणार नाही याची काळजी त्यांनी प्रामुख्यानं घ्यायला हवी,’ असं भुजबळ म्हणाले.

शिवसेनेत होतात या पुण्याईवर आज तुम्ही टिकून आहात, असं राऊत यांनी भुजबळांना सुनावलं होतं. त्याचाही भुजबळ यांनी समाचार घेतला. ‘शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो हे म्हणालो होतो हे मला मान्य आहे. पण कुणालाही काम केल्याशिवाय जबाबदारी मिळत नाही. संजय राऊत यांनाही काम केल्यामुळंच ‘सामना’चं संपादकपद मिळालं. शिवसेनेच्या शाखा मी जेव्हा राज्यात सुरू केल्या, त्यावेळी संजय राऊत नव्हते. ‘सामना’च्या लॉचिंगच्या वेळेचेही फोटो माझ्याकडं आहेत. मी शिवसेना मोठी केली, तेव्हा ते खासदार देखील नव्हते, असा खोचक टोला भुजबळ यांनी हाणला. ‘नांदगाव मतदारसंघाबाबत ते जे काही बोलले, त्याबद्दल मला पवार साहेबांशी बोलावं लागेल. नांदगावमध्ये मी जे काम केलंय, ते त्यांना माहीत नसावं. मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी या मतदारसंघात परत परत यावं,’ असंही भुजबळ म्हणाले.

WhatsAppShare