मला न्याय मिळाला, पण ताईवर अन्याय झाला – चंद्रकांत पाटील

0
580

पुणे, दि. ७ (पीसीबी) – राज्यात महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या बंडोबांची मनधरणी करण्यासाठी सर्वच पक्षीय नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, आज दुपारी तीन वाजेपर्यंत बंडखोर उमेदवार माघार घेतील असा विश्वास भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच, या निवडणुकीत मला न्याय मिळाला, पण मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाल्याचे त्यांनी नमूद केले. ताईंवर अन्याय झाला असला तरी त्यांना जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही असे पाटील म्हणाले.

पुण्यात कोथरूड विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण संघटनेची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि ब्राह्मण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, अनेक राजकीय घडामोडीवर पाटील यांनी भूमिका मांडली. “रामदास आठवले आणि माझी सदिच्छा भेट झाली असून मित्रपक्षामध्ये कोणत्याही प्रकारे निवडणूक चिन्हावरुन नाराजी नाही”,  असे पाटील म्हणाले. तसेच, कोथरुडकरांनी विश्वास दिला तर मी राज्यात मोकळ्या मनाने फिरेल असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमधून महायुतीमधील अनेक मुद्दे समोर आणले आहेत. तसेच शिवसेनेला उपमुख्यमंत्री देण्याबाबत ठरले आहे का? या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांची मुलखात अद्याप पाहिलेली नाही. पण, मुख्यमंत्री पदाबाबत लोकशाहीमध्ये इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे.  निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होईल”, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.