“मला तुझा पहिलेच काटा काढायचा होता, आता तुला सुट्टी नाही”; म्हणत एकास बेदम मारहाण

120

चाकण, दि.23 (पीसीबी) : ओळखीच्या व्यक्तीने एकास दारू पाजतो म्हणून कोरेगाव घाटाच्या शेजारी असलेल्या खदानीजवळ नेले. तिथे शिवीगाळ करून ‘मला तुझा पहिलेच काटा काढायचा होता, तू आज माझ्या तावडीत सापडला, आता तुला सुट्टी नाही, असे म्हणत बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 21) घडली.

सुभाष धोंडीबा डावरे (वय 31, रा. कोरेगाव, ता. खेड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत मंगळवारी (दि. 22) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन ज्ञानेश्वर बालघरे (वय 35, रा. कोरेगाव बुद्रुक, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपी सचिन याने फिर्यादी सुभाष यांना ‘चल तुला दारू प्यायला नेतो’, असे बोलून सुभाष यांना कोरेगाव घाटाच्या शेजारी असलेल्या खदानी जवळ नेले. तिथे सुभाष यांच्या पत्नी व आई विषयी शिवीगाळ केली. याबाबत सुभाष यांनी आरोपीला देखील शिवीगाळ केली. त्यावरून आरोपीने लोखंडी रॉडने सुभाष यांना मारले. तसेच शिवीगाळ करत ‘मला तुझा पहिलेच काटा काढायचा होता, तू आज माझ्या तावडीत सापडला, आता तुला सुट्टी नाही’, असे म्हणत पुन्हा लोखंडी रॉडने मारून जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare