मराठी विज्ञान परिषदेतर्फे रविवारी शालेय अभ्यासक्रमावर मार्गदर्शन

69

पुणे, दि. ७ (पीसीबी) – दहावीच्या अभ्यासक्रमात आणि परीक्षा पद्धतीत होणारे बदल समजून घेण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे शालेय अभ्यासक्रमावर मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. येत्या रविवारी (दि. १०) सकाळी ८.३० ते ११ या वेळेत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हे मार्गदर्शन करण्यात येईल. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख व माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांच्या हस्ते मार्गदर्शन सत्राचे उद्घाटन होणार आहे.

यंदा दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. पाठ्यपुस्तकांचे स्वरूपही बदलले आहे. परीक्षा पद्धतीतही आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. या सर्व बदलांची माहिती पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यापर्यंत पोचावी म्हणून मराठी विज्ञान परिषदेने या ‘नवी दहावी अभ्यासक्रम माहिती सत्र’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सत्रात माध्यमिक शालांत परीक्षेच्या पुणे येथील मंडळाच्या विविध विषयांच्या अभ्यास समित्यांवरील तज्ज्ञ आणि अनुभवी सदस्य सहभागी होणार आहेत. त्यात डॉ स्नेहा जोशी (मराठी), डॉ. शिवानी लिमये (इतिहास), डॉ. सुलभा विधाते (विज्ञान)  यांचा समावेश आहे. प्रश्नोत्तरांसाठी काही वेळ राखून ठेवण्यात आला आहे.

हे मार्गदर्शन सत्र पूर्णपणे विनामूल्य असून, दहावीचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन विज्ञान परिषदेतर्फे करण्यात आले आहे.