मराठा समाजाशी चर्चा करण्यास सरकार तयार – मुख्यमंत्री फडणवीस

261

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – मराठा समाजाने हिंसा किंवा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता शांतता राखावी. समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारशी चर्चा करावी. मराठा समाजाशी चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे मराठा क्रांती मोर्चाला आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून होणारी आंदोलने, आत्महत्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न या सर्व गोष्टी दु:खद आहेत, असे सांगून काही राजकीय नेते परिस्थिती आणखी चिघळवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. सर्वांनी महाराष्ट्राच्या हितासाठी व्यापक भूमिका घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मराठा समाजाने शांततापूर्ण काढण्यात आलेल्या मोर्चांची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मराठा समाजाच्यासाठी अनेक प्रकारचे निर्णय घेतले आहेत. अनेक योजना किंवा इतर बाबींमध्ये कोणत्याही त्रुटी आढळल्यास त्या चर्चेच्या माध्यमातून दूर केल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मेगाभरतीच्या संदर्भात जो संभ्रम सकल मराठा समाजाच्या मनात आहे, त्याही बाबतीत चर्चा करून सर्वमान्य असा तोडगा काढणे शक्य आहे. त्यामुळे हिंसा किंवा आंदोलनाचा मार्ग न निवडता सरकारशी चर्चा करावी, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.