मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको – अजितदादा पवार

1171

बारामती, दि. १० (पीसीबी) – मराठा समाजाचे आतापर्यत सर्वांत मोठे मोर्चे शांततेत निघाले आहेत. आघाडी सरकार असताना मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण देताना ५२ टक्के आरक्षणाला आम्ही धक्का लागू दिला नाही. त्यावेळेस नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, त्यावेळेसच्या चर्चेनुसार मराठा समाजाला नोकरी व शिक्षणासाठी आरक्षण हवे आहे असून राजकीय आरक्षण नको, असे सांगितल्याचे ‘राष्ट्रवादी’चे नेते अजितदादा पवार यांनी सांगितले.

ते बारामती येथे पत्रकारांशी बोलत होते.

अजितदादा म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. मात्र, तत्कालीन काळातील बापट आयोगाची सकारात्मक भूमिका नव्हती. मराठा आरक्षण पुढे टिकविण्यासाठी भाजप सरकारकडून पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. चांगले वकील दिले असते, कायदेशीर बाबी तपासल्या असत्या तर आजची वेळ आली नसती. सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी सतरा महिने म्हणणेच मांडले नाही. वेळीच निर्णय घेतला असता तर मराठा तरुण-तरुणींच्या आत्महत्या झाल्या नसत्या. सरकारने आता तरी गांभिर्याने विचार करावा अन्यथा त्यांना मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल,’ असा इशारा पवार यांनी दिला. राज्यातील परिस्थिती अस्थिर झाली आहे. तृतीय व चतुर्थ सरकारी कर्मचारी संपावर आहेत. मराठा आरक्षणाला सध्या लागलेले वेगळे वळण सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यामुळे लागले आहे,’ असेही पवार म्हणाले.