मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होणार का? ५ ऑगस्टला पुण्यात बैठक

170

पुणे, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाचा समावेश इतर मागास प्रवर्गात करता येईल का, हे पडताळून पाहण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्राच्या पाच विभागांमध्ये सर्व्हेक्षण करुन घेतले आहे. याबाबतचा अहवाल मंगळवारी (दि.३१) मागासवर्ग आयोगाच्या पुण्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयात सादर केला जाणार आहे. या सर्व्हेंचे विश्लेषण आणि पडताळणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने ५ आणि ६ ऑगस्टला पुण्यात विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.

माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा मागासवर्ग आयोग काम करत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा सर्व्हे पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेने केला आहे. मुंबई आणि कोकणचा सर्व्हे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने केला आहे. तर मराठवाड्याचा सर्व्हे औरंगाबादच्या शिवाजी अकॅडमी या संस्थेने केला आहे. विदर्भाचा सर्व्हे शारदा अकॅडमी या संस्थेने केला आहे. उत्तर महाराष्ट्राचा सर्व्हे गुरुकृपा संस्थेने केला आहे.

या पाच संस्थांमार्फत केले जाणारे सर्व्हे अधिक सखोल असल्याचे सांगितले जात आहे. आरक्षण मिळण्यासाठी या सर्व्हेमधून मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध व्हावे लागणार आहे. दरम्यान, ओबीसीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास २५०, तर देशभरातील ५५० जातींचा समावेश आहे. तर ओबीसीला देशपातळीवर २७ टक्के आरक्षण आहे.