मराठा मोर्चाचे गुरुवारी ठिय्या आंदोलन; शहर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त

257

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी ९ ऑगस्ट क्रांती दिनी पुकारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनामुळे राज्यभरासह पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण परिसरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गुरुवारी पुणे शहरातील सर्व मराठा समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यलयावर २ ते ३ तास ठिय्या आंदोलन करणार आहेत, तर तालुका पातळीवर सर्व आंदोलक तहसील कार्यलयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांनी हिंजवडी येथील द्रुतगती मार्ग रोखून धरला होता, वाल्हेकरवाडी चिंचवड येथील दुकानांवर दगडफेक करण्यात आली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंचवड येथील सभा मराठा आंदोलकांकडून उधळण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच लगतच्या चाकण परिसरात या आंदोलनाने विक्राळ स्वरुप धारण केले होते. यामध्ये आंदोलकांनी १०० वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. ज्यामध्ये १० कोटींचे नुकसान झाले होते.

या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी पुकारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलना दरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामिण पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील संवेदनशील असलेले पिंपरी, चिंचवड, भोसरी, हिंजवडी या ठिकाणी आदल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर चाकण परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. सध्या मराठा आरक्षण हा विषय न्याय प्रविष्ठ असल्याने उच्च न्यायालयाने हिंसक आंदोलण करणे चुकीचे असल्याचे सांगितले होते. यामुळे राज्यातील बऱ्याच ठिकाणी बंद मागे घेण्यात आला असून ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड परिसरात मराठा क्रांती मोर्चासाठी १२० पोलीस अधिकारी आणि १ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती परीमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त मंगेश शिंदे यांनी दिली आहे.