मराठा तरूणावर गुन्हे दाखल झाल्याने नोकऱ्या मिळणार का? – राज ठाकरे

134

नवी मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी तरुणांवर ३०७ कलमाअंतर्गत गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. त्यामुळे आता आरक्षण मिळाले तरी त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही, असे   राज ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच मराठा आंदोलनात परप्रांतियांच्या सहभागावरुनही सरकारवर राज ठाकरे यांनी निशाणा साधला. 

नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कर्मचारी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, सरकार जनतेला कोट्यवधींच्या योजनांचे आमिष दाखवून फसवणूक करत आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत, मात्र त्या भरण्यासाठी सरकारकडे पैसा नाही का? असा सवालही त्यांनी केला.

मराठा समाज शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागत आहे. मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. फक्त कोट्यवधींच्या घोषणा करत आहे. जनतेला त्यांच्या या घोषणांमधून आशा वाटते, ते टाळ्या वाजवतात. मात्र सरकार जनतेची फसवणूक करत आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला. नवी मुंबईतील कळंबोलीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनात परप्रांतिय चेहऱ्यांचा सहभाग होता. परप्रांतिय चेहऱ्यांमुळे आंदोलन बदनाम होऊ देऊ नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले .