मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण; सोलापूरात १७ बसची तोडफोड

61

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्याचे पडसाद  पुणे, मुंबई आणि सोलापूरसह राज्यभरात उमटू लागले आहेत. आंदोलकांनी बार्शी महामार्गावरील वडाळा गावाजवळ दगडफेक करून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १७ बसची तोडफोड केली, तर एका बसला आग लावली. या घटनांमध्ये महामंडळाचे १२ लाखांचे नुकसान झाले आहे.  

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोनशे तरुणांनी मुंबईतील दादरच्या भारतमाता सिनेमाजवळील फुटपाथवर ठिय्या आंदोलन केले. ‘एक मराठा, लाख मराठा’ अक्षरे लिहिलेल्या टोप्या घालून हे आंदोलक ठिय्या आंदोलनात सहभागी  झाले होते. यावेळी या तरुणांनी सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात घोषणाबाजी केली. पुण्यातही आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी आंदोलकांनी बस फोडून सरकारचा निषेध केला. शनिवारी मध्यरात्री वाकड, भुमकर चौकात काही तरुणांनी वाहनांची तोडफोड केली होती.

राज्यभरातून पंढरपूरला येणाऱ्या एसटी बसना सोलापूरमध्ये लक्ष्य करण्यात येत आहेत.   पंढपूरला जाणाऱ्या या एसटीमधून प्रवास करणारे सर्वजण वारकरी असल्याने वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आंदोलकांच्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढीची पूजा न करण्याचा निर्णय घेतला  आहे. तर आंदोलकांनी आंदोलनांवर ठाम असल्याचे सांगितले आहे.