मराठा क्रांती मोर्चाची बुधवारी मुंबई बंदची हाक

130

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी (दि.२५) मुंबई बंदची हाक देण्‍यात आली आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणीही बंद पुकारण्‍यात आला आहे. मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्‍या समन्‍वयकांच्‍या आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला आहे. कल्‍याण येथील तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्‍वयकांनी दिली.

औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे या आंदोलकाने नदीत उडी मारून आत्महत्या केली. यामुळे मराठा मोर्चाच्या आयोजकांनी आज (मंगळवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली. दरम्यान, ठिकठिकाणी आंदोलकांनी रास्तारोको केला. यामध्ये सकाळी औरंगाबाद-पुणे महामार्गावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक रोडावली. त्यामुळे पुण्याहून औरंगाबाद येथे सोडण्यात येणाऱ्या एसटी बस रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र बंददरम्यान वारकरी आणि रुग्णवाहिकांना लक्ष्य करु नये, असे आवाहन मराठा संघटनांतर्फे करण्यात आले आहे. मात्र, तरीही आंदोलकांचा आक्रमक पवित्रा दिसून येत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे गंगापूरमधील गोदावरी नदीवरील पुलावर आंदोलन सुरु असून याच पुलावरुन सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीत उडी मारली होती.