मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे सरकार गंभीर नाही – चंद्रकांत पाटील

13

मुंबई,दि.२७(पीसीबी) – मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे सरकार मुळीच गंभीर नाही असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नाही असं आज दिसून आलं असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाच्या केसचा पुकारा झाला तेव्हा कोणीही हजर नव्हतं. याला काय म्हणायचं? महाराष्ट्र्र सरकार एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नी गंभीर नाही हेच दिसून आलं आहे. मराठा आरक्षण सरकारला द्यायचं नाही हेच यातून दिसून येतं आहे. आता चार आठवडे मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती दिली आहे त्यामुळे सगळं काही ठप्प झालं आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दसरा मेळाव्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्जना केली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने आम्ही बांधील आहोत. आधी स्थगिती तर उठवा असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. या प्रकरणात भाजपाला मुळीच राजकारण करायचं नाही. मात्र सरकार मराठा आरक्षण प्रकरणी गंभीर नाही हा आमचा आरोप आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलवून एकदा बैठक घेण्याचं नाटक ठाकरे सरकारने केलं. मात्र मराठा आरक्षण प्रश्नी पुढची दिशाच ठरलेली नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

WhatsAppShare