मराठा आरक्षणासाठी शरद पवार विरोधी पक्षांचे सहकार्य मिळवतील – अजित पवार   

202

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळावण्यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर होण्यासाठी तीन चतुर्थांश बहुमतांची आवश्यकता आहे.  भाजपकडे हे बहुमत नाही. मात्र, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार विरोधी पक्षांचे सहकार्य मिळवतील,  असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षियांची बैठक बोलावली होती. या  बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलताना  म्हणाले की,  मराठा समाज आमच्यावरही नाराज आहे. आरक्षणासाठी केंद्र आणि राज्यातील सरकारने पावले उचलण्याची गरज आहे.

मराठा समाज आमदारांवरही नाराज असल्याने काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्हीही प्रयत्न करण्यास तयार आहोत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची  बैठकही घेण्यात येणार आहे, तेथे याबाबत विचारविनीमय करण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

पवार पुढे म्हणाले की, एससी, एसटी, एनटी, आणि ओबीसीसाठी असलेल्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण मिळावे, यासाठी मागास आयोगाचा अहवाल तातडीने येणे आवश्यक आहे. या अहवालाच्या आधारे महाराष्ट्राच्या विधिमंडळात या प्रस्तावाला एकमताने मंजुरी मिळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांकडून सहकार्य केले जाईल.