मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार – मुख्यमंत्री फडणवीस

161

नागरपूर, दि. २८ (पीसीबी) – मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी  सर्व पक्षीय नेत्यांची बैठक आज (शनिवार) येथे बोलावली होती. या बैठकीत आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी आरक्षणासंदर्भात विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाला तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण देण्यासंदर्भात मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याबाबतचा अहवाल लवकरात लवकरत सादर करण्यात यावा, अशी विनंतीही सरकारसह विरोधी पक्षांच्यावतीने करण्यात आली.

दरम्यान, राज्यात मराठा आंदोलनादरम्यान  हिंसक घटना घडल्या होत्या. यामध्ये पोलिसांवर हल्ले करण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये काहींनी पोलिसांच्या गाड्या फोडण्याचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे दिसून आले आहे. या कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, या व्यतिरिक्त तरुणांवर जर गुन्हे दाखल झाले असतील, तर ते मागे घेण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.