मराठा आरक्षणासाठी माथाडी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

131

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – मराठा आरक्षणाची मागणी करत एका माथाडी कामगाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना आज (शनिवारी) पहाटे पाचच्या सुमारास तुर्भे गावात घडली. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अरुण भडाले (वय २६, रा. तुर्भे) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण भडाले हा अविवाहित होता. अरुण भडाले यांनी राहत्या घरी नायलॉनच्या रस्सीने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या कोपरखैराणे येथे राहणाऱ्या आत्तेभावाकडे सुसाईट नोट सापडली आहे. या सुसाईट नोटमध्ये आर्थिक अडचण आणि मराठा आरक्षणाचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भडाले यांना कर्ज हवे होते. मात्र त्यासाठी त्याने अनेकदा विविध ठिकाणी प्रयत्न केले. परंतू त्याला कर्ज मिळाले नाही. कर्ज कोणत्या कामासाठी हवे होते याबाबत तो कोणालाही बोलला नव्हता. मात्र आर्थिक परिस्थितीवरून तो चिंताग्रस्त होता. याच कारणावरून गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिस तपास करत आहेत.