मराठा आरक्षणासाठी घटना दुरूस्तीची गरज नाही – नारायण राणे

151

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरूस्ती करण्याची कोणतीही गरज नाही, असे महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले आंदोलन आता थांबायला हवे, असे सांगून आंदोलकांना राणे यांनी शांततेचे आवाहन केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणे बोलत होते.    

नारायण म्हणाले की, येत्या तीन महिन्यात हा प्रश्न निकाली लागेल आंदोलनात हिंसा करून काहीही साध्य होणार नाही. आंदोलनाला हिंसक वळण लागण्यामागे राजकीय पक्ष असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला. शरद पवार हे राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी आंदोलनाला लागलेले हिंसक वळण रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. हिंसक आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या प्रतीमेला काळीमा लागत आहे. त्यामुळे मराठा बांधवांनी आंदोलन मागे घ्यावे, असे नारायण राणे यावेळी म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने घटनादुरूस्ती करावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष    शरद पवार यांनी व्यक्त केले होते. तसेच सरकारने तशी तयारी दर्शवल्यास आपण विरोधकांना त्याची गरज समजावून सांगू, असेही शरद पवारांनी म्हटले होते. आता नारायण राणे यांनी ही भूमिका खोडून काढत घटना दुरूस्तीची गरज नसल्याचे म्हटले आहे.