मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामुहिक राजीनामे देणार ?

131

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस आमदारांनी सामूहिक राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. तर काँग्रेस आमदारांच्या भावना तीव्र आहेत, सामूहिक राजीनाम्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

काँग्रेसच्या वतीने आज (सोमवार) राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी या विषयात लक्ष घालण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. काँग्रेस यामध्ये सर्व प्रकारचे सहकार्य करायला तयार आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली.

दरम्यान, मराठा मोर्चाच्या आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी चव्हाण यांनी केली. गुन्हेगार नसतील तर गुन्हे मागे घेतले पाहिजेत. मराठा, धनगर आणि मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकालात काढण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली. शिवसेनेचे वरातीमागून घोडे आहे. जर या मुद्द्याबाबत ते गंभीर असतील तर सरकारमधून बाहेर पडावे, असे चव्हाण म्हणाले.