मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या प्रमोदच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत

301

औरंगाबाद, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी परिसरात रेल्वेखाली उडी मारून प्रमोद होरे-पाटील या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेनंतर प्रमोद होरे-पाटील याच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत आणि पात्रतेनुसार कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.  

रविवारी संध्याकाळी ‘मराठा आरक्षण जीव जाणार’ असं कॅप्शन टाकून प्रमोद यांने रेल्वे रुळाजवळ उभा असतानाचा फोटो फेसबुकवर एक पोस्ट केला होता. त्यानंतर त्याच्या मित्र-मैत्रिणींनी फेसबुकवर त्याची पोस्ट पाहिली आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता रात्री त्याने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. आत्महत्येपूर्वी प्रमोदने काही मित्रांना टॅग करत आणखी एक पोस्ट टाकली होती. ‘चला आज एक मराठा जातोय… पण काही तरी मराठा आरक्षणासाठी करा…प्रमोद पाटील मराठा आरक्षणाचा चौथा बळी,’ असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले होते.

प्रमोद पाटील हा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र आरक्षण नसल्याने तयारी करून देखील समाज बांधवांना संधी मिळत नाही यामुळे तो नाराज झाला होता. अखेर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपला जीव देत असल्याचे त्याने फेसबुकवर फोटो पोस्टमधून जाहीर केले होते.