मराठा आरक्षणासाठी आत्महत्या सत्र सुरुच; नांदेडमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या

149

नांदेड, दि. २९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील बांधवांचे आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. नांदेड जिल्ह्यातील आरधापूर तालुक्यातील दाभड या गावातील एकाने राहत्या घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (रविवार) दुपारच्या सुमारास घडली.

कचरू दिगंबर कल्याणे (वय ४२, रा. दाभड, ता. आरधापूर, जि. नांदेड) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवार कल्याणे कुटूंबातील सर्वजण बाहेर गेल्यानंतर कचरु कल्याणे यांनी खिशात चिठ्ठी लिहून ‘एक मराठा- लाख मराठा’ मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी चिठ्ठी लिहून त्यांनी छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई बाहेरुन घरी आल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावकरी व परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. आरधापूर पोलिस तपास करत आहेत.