मराठा आरक्षणावर राहुल गांधींनी बोलावली बैठक  

101

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यभर वातावरण तापले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील याची गंभीर दखल घेतली असून बैठक बोलावली आहे. राहुल गांधी यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक ८ ऑगस्टला बोलावली आहे. यावेळी राहुल गांधी नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ७ ऑगस्टपर्यंत समाजाच्या सर्व मागण्यांवर विचार करावा, अन्यथा राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा मोर्चाने राज्य सरकारला दिला आहे. सकल मराठा मोर्चाला परळीतून सुरुवात झाली. त्यामुळे समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारने परळीत येऊनच चर्चा करावी. आमचे कोणतेही समन्वयक सरकारशी चर्चेसाठी जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला घेण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयात लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. यानंतर न्यायाधीश रणजीत मोरे आणि अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठाने सुनावणी १४ ऑगस्टऐवजी ७ ऑगस्टला घेण्याचा निर्णय घेतला आहे.