मराठा आरक्षणावरून पुणे महापालिकेत राडा; शिवसेना – भाजप नगरसेवकांत जुंपली  

99

 पुणे, दि. २६ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद आज (गुरूवार) पुणे महापालिकेत उमटले. शिवसेनेने मराठा आरक्षणाला आणि आंदोलनाला पाठिंबा दिल्याने पुणे महापालिकेत राडा झाला. भाजप विरोधात विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी भूमिका मांडू न दिल्याने सभागृहात शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी महापौरांसमोरील साहित्य फेकून निषेध व्यक्त केला.

मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्याची मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे विरोधकानी केली. मात्र, त्यावर  बोलण्यास विरोध केल्याने संजय भोसले यांनी महापौरांसमोरील मानदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप नगरसेवक दीपक पोटे यांनी मानदंड बाजूला घेतला. त्यामुळे भोसले यांनी महापौरासमोरील साहित्य फेकून दिले. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकाच्या अंगावर भाजप नगरसेवक धावून गेले.

या घटनेमुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर भाजप आणि विरोधकानी एकमेका विरोधात घोषणाबाजी केली. सभागृहातील परिस्थिती लक्षात घेता. महापौर मुक्ता टिळक यांनी सभा तहकूब केली. याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी भाजप नगरसेवकाकडून सभागृहात करण्यात आली.