मराठा आरक्षणाबाबतची बैठक बंद दाराआड नको – खासदार संभाजीराजे

94

पुणे, दि. ४ (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे मी नेतृत्व करणार नाही. मात्र, समाजाच्या मागे खंबीरपणे उभा राहील आणि एका समनव्यकाची भूमिका पार पाडणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडून लवकरात लवकर बैठक बोलवावी. त्या बैठकीत माझ्यासह सर्वच मराठा समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी करून घ्यावे. ही बैठक बंद दाराआड न होता. संबंध महाराष्ट्राला समजेल, अशा पध्दतीने घ्यावी. प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीना बोलावून त्याचे थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी आज (शनिवार) खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली.  

संभाजी राजे एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते.  त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि गुन्हे मागे घेण्यात यावे. या मागण्याचे निवेदन देखील त्यांनी यावेळी दिले. पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे  म्हणाले की,  राज्यात आजपर्यंत ५८ मूक मोर्चे काढण्यात आले. त्या मोर्चाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. तरीही समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मराठ समाज रस्त्यावर उतरला आहे. मात्र, प्रत्येकाने हिंसक मार्गाने आंदोलन न करता शांततेच्या मार्गाने करावे. कायदा हातामध्ये घेऊ नये. त्याच बरोबर आत्महत्यासारखे पाऊल उचलू नये, असे आवाहनही संभाजीराजे यांनी यावेळी  मराठा समाजातील कार्यकर्त्यांना केले.