मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणारे राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या वाटेवर 

332

औरंगाबाद, दि. ११ (पीसीबी) –  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्र्वादी काँग्रेसच्या  गळतीचे सत्र कायम आहे. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारकीचा राजीनामा दिलेले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यामध्ये अनेक आमदारांनी राजीनामे दिले होते.  यात चिकटगावकर यांचा देखील समावेश होता.  भाजप प्रवेशासाठी त्यांचे व्याही भाजप खासदार प्रतापराव पाटील चिकटगावकर यांनी आग्रह धरला आहे, असेही सांगितले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रे दरम्यान औरंगाबाद येथे आयोजित सभेला चिकटगावकर यांनी पाठ फिरवली होती.  त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. येत्या दोन दिवसांत भाऊसाहेब चिकटगावकर भाजप प्रवेश करतील, अशी माहिती मिळत  आहे.

दरम्यान, आज (बुधवार)  भाजपमध्ये तिसऱ्यांदा मेगाभरती होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील जेष्ठ नेते गणेश नाईक , पुण्यातील  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर राष्ट्रवादीचे  आमदार अवधूत तटकरे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 

WhatsAppShare