मराठा आरक्षण: सकल मराठा समजाच्यावतीने आज राज्यभरात ‘जेलभरो’ आंदोलन

170

मुंबई. दि. १ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समजाच्यावतीने आज राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील आझाद मैदानातून सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरुवात होत आहे. या आंदोलनासाठी सकल मराठा समाजाकडून काही मागण्या प्रामुख्याने समोर ठेवण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या वतीने चालू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा म्हणून १ ऑगस्टला जेल भरो आंदोलन होणार असल्याचे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले.

मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून मुंबईसह ठाणे व इतर ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटल यांनी मराठा समाजाची माफी मागावी, समाजासाठी ज्यांनी प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी ५० लाख रुपये व जखमींना १० लाख रुपये देण्यात यावेत. कळंबोली येथे महिला वर केलेल्या बेछुट लाठीचार्ज आणि गोळीबार संदर्भात सदर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, व त्यांना त्वरीत निलंबित करावे. अशा मागण्या आहेत

दरम्यान, आपल्या मागण्या घेऊन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात  १ऑगस्ट २०१८ पासून जेल भरो आंदोलन सुरू होईल, असे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले आहे.