मराठा आरक्षणाचा बळी; बीडमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या

122

बीड, दि. ४ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून आरक्षणासाठी आत्महत्या सत्र सुरूच आहे. बीडमध्ये आत्महत्येची तिसरी घटना समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे एवढीच अंतिम इच्छा असल्याची चिठ्ठी लिहून पिंपळेनेर येथील आंदोलन शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

शिवाजी तुकाराम काटे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या आंदोलकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटे हे मुळचे बीड जिल्ह्यातील पिंपळनेर गावचे आहेत. काही दिवसांपासून ते जवळील बेडूकवाडी येथे राहत होते. शुक्रवारी (दि. ३) रात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या शर्टच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. त्यामध्ये मराठा समाजासाठी मी माझे जीवन संपवीत असल्याचे नमूद केले आहे. मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये, समाजाला आरक्षण द्यावे, असा मजकूर लिहिलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस तपास करत आहेत.