मराठा आरक्षणाचा प्रस्ताव तातडीने केंद्राला पाठवा; केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

397

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – मुंबईसह राज्यभरात पेटलेला मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा शुक्रवारीही धुमसत आहे. मराठवाड्यासह राज्यभरात आंदोलनाला हिंसक वळण लागले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी यांची बैठक गुरुवारी (दि. २६) रात्री उशीरा १ च्या सुमारास संपली. बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात मागास आयोगाचा अहवाल राज्यसरकारने लवकरात लवकर द्यावा, अशी भूमिका मांडण्यात आली. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी विधानसभेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवण्यात येणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत.

दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या आंदोलनांची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना घटनेच्या चौकटीत राहून आरक्षण देता येईल काय, याची चाचपणी केंद्र सरकारने सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्याची सूचना केली आहे.