मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा लांबणीवर  

63

सांगली, दि. २६ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली दौरा लांबणीवर टाकला आहे. वाळवा तालुक्यातील आष्टा येथील अतिरिक्त तहसिल कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमासाठी आणि सांगली महापालिकेच्या प्रचार सभेसाठी शुक्रवारी (दि.२७) मुख्यमंत्र्यांचा नियोजित सांगली जिल्हा दौरा होता. आता ३० जुलै रोजी मुख्यमंत्री सांगली दौऱ्यावर जातील, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोणत्याही मंत्र्याला वाळवा तालुक्‍यात पाय ठेवू द्यायचा नाही, असा ठराव मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर हा दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे.

या दौऱ्यात सांगली महापालिकेच्या प्रचारासाठी सांगली आणि मिरजेत  मुख्यमंत्र्याच्या सभा होणार होत्या.  या सभेमुळे महापालिकेच्या प्रचारात वातावरण  निर्मिती करण्याची भाजपने तयारी सुरू केली होती. मात्र,  मराठा समाजाने या दौऱ्याला विरोध केल्याने हा दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे.