मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा कट; हिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या चौकशीतून उघड    

892

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी मराठा आंदोलनात स्फोट घडवण्यासाठी कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती प्राथमिक चौकशीतून उघड झाली   आहे. मराठा आंदोलनाला समर्थन देण्यासाठी स्फोट घडवले जाणार होते. त्याचबरोबर या स्फोटाच्या माध्यमातून द्वारे सरकारला इशारा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता, अशी माहितीही समोर आली आहे.

महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा आणि राज्याच्या अन्य भागांमधून तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना ताब्यात घेतले आहे. वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या तिघांकडून पोलिसांनी गावठी बॉम्ब, बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य, जिवंत काडतुसे जप्त केली होती. या तिघांनी मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे हल्ला घडवण्याचा कट रचला होता. स्फोटांची तीव्रता कमी ठेवून हा स्फोट घडवणार होते. केवळ  गोंधळ निर्माण करणे इतकाच त्यांचा उद्देश होता. एका संशयिताने पोलिसांना सांगितले की, मराठा आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर हे स्फोट घडवले जाणार होते.

सुधन्वा गोंधळेकर हा मराठा आंदोलनांवर लक्ष ठेवून होता. मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या अनेक व्हॉट्स अॅप ग्रुपमधील तो सदस्य होता. तसेच गोंधळेकर हा पूर्वी संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता होता. या तिन्ही संशयितांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि मेसेज मिळवले जात आहेत. त्या तिघांनी भेट दिलेल्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.