मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार – मुख्यमंत्री

105

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्गीय आयोग सर्व बाबी तपासून  महिनाभरात अहवाल देणार आहे. त्यानंतर त्याबाबत सभागृहात चर्चा करण्यात येईल. त्यामुळे सकल मराठा समाजाने राज्यात शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  मराठा आंदोलकांच्या  प्रतिनिधींशी आज (रविवार) मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहार बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी खासदार नारायण राणे उपस्थित होते.  

त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले  की, मराठा तरुणांवर अन्याय न होता  मेगा भरतीची व्यवस्था केली जाईल. त्यामुळे त्यांनी या भरतीबाबत काळजी करु नये. मराठा आंदोलनादरम्यान, तरुणांवर दाखल केलेले ३०७ सह सर्व प्रकारचे गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र, ज्यांनी पोलिसांवर हल्ले आणि जाळपोळींसारखे प्रकार केले आहेत, ते स्पष्टपणे व्हिडीओंमध्ये दिसत आहेत, त्यांच्यावरील गु्न्हे कुठल्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच आंदोलनात काही संशयित लोक घुसल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली जाणार आहे. यातील घुसखोरांबाबतची चौकशी  करण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान काकासाहेब या  तरुणाचा झालेला मृत्यू दुर्देवी आहे. अशा घटना रोखण्यासाठी समन्वयकांनी जबाबदारी घेऊन राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाच्या ज्या आमदारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भावनेच्या भरात राजीनामे दिले आहेत. त्यांच्याशीही आम्ही चर्चा केली आहे. आपल्याला सर्वांना मतदान करुन समाजाला आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे राजीनामे देऊन हे शक्य होणार नाही. तेव्हा आपण सभागृहात आरक्षणाच्या बाजूने मतदान केले पाहिजे, असे आवाहन त्यांना करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.