मनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड

575

मुंबई, दि. २० (पीसीबी) मनुवादी लोक हिंदूंना बदनाम करत असून शिव्या देणे, दुसऱ्यांवर आरोप करणे ही यांची संस्कृती आहे. पारंपारिक हिंदू संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम हे लोक करत आहेत. यांच्यामुळे आपल्या देशाचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर निवेदन देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  वैभव राऊतला अटक केल्यावर त्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत. उद्या असेच मोर्चे जर मुस्लिम बांधवांनी काढले आणि त्यात ‘देशका नेता कैसा हो’ सारख्या घोषणा दिल्या तर? हे असे होणार असेल, तर आपल्या देशाचा अफगाणिस्तान व्हायला अजिबात वेळ लागणार नाही असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचाही उल्लेख करत  दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी हे सचिन अंदुरेपर्यंत पोहचले आहेत. त्यांचे अभिनंदन करतो, मात्र या विवेकवादी लोकांना मारणाऱ्यांचे हात शोधले आहेत. आता यामागचे बाप अर्थात सूत्रधार कोण आहेत तेदेखील शोधा, असेही आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

या लोकांनी विवेकवादी लोकांनाच ठार का केले? पाकिस्तानात जाऊन झकीर उर रहमान लख्वीला किंवा हाफिज सईदला गोळ्या घालण्याची हिंमत यांनी का दाखवली नाही, असा प्रतिसवालही आव्हाड यांनी आपल्या निवेदनात उपस्थित केला आहे.