मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचं वर्तन असंवैधानिक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

113

पंतप्रधान कार्यालयाकडे केली लेखी तक्रार

प्रतिनिधी ३० जून(पीसीबी) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वादग्रस्त महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची लेखी तक्रार केंद्र शासनाकडे केली आहे. ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’चे सीईओ पदी कार्यरत असलेले तुकाराम मुंढे यांचे वर्तन असंवैधानिक, अवैध आणि घोटाळेबाज असल्याचे तक्रार गडकरी यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली आहे. जितेंद्र सिंह यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी आहे.

तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्विकारताच ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या सीईओपदाची जबाबदारी अवैधरीत्या बळकावल्याचा आरोप गडकरींनी केला आहे. विविध निविदा रद्द करणे, कोरोनासारख्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे असे अनेक वादग्रस्त निर्णय मुंढे यांनी घेतल्याचा दावा गडकरींनी पत्राद्वारे केला आहे.

याशिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पाची बँकेत असलेली १८ कोटींची ठेवीची रक्कम दोन खाजगी ठेकेदारांना वळवण्यात आल्याचा आरोप नागपुरचे महापौर संदीप जोशी यांनी यापूर्वी केला आहे. आयुक्त मुंढे यांनी नियम धाब्यावर बसवून बँकेतील ठेवी तोडल्याचा आरोप महापौरांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापौर संदीप जोशींनी केलेल्या आरोपांची दखल घेत तुकाराम मुंढे यांची तक्रार पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली. तसेच योग्य कारवाई करण्याची मागणी गडकरी यांनी केली आहे. गडकरीं सारख्या वजनदार मंत्र्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडेच धाव घेतल्याने मुंढे यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsAppShare