मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या जनआशीर्वाद यात्रेवर दगडफेक

120

भोपाळ, दि. ३ (पीसीबी) – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या  जन आशीर्वाद यात्रेदरम्यान, त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.  यावेळी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली.  

जनआशीर्वाद यात्रा रविवारी सीधी जिल्ह्यातील चूरहट येथे आली असता  शिवराजसिंह यांच्या बसवर आंदोलकांनी दगडफेक केली आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेही दाखवले. दगडफेक करणारे हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते की एससी- एसटी कायद्यातील बदलांविरोधात आंदोलन करणाऱ्या संघटनेचे कार्यकर्ते होते. याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

दरम्यान,  भाजपने या घटनेसाठी काँग्रेसला जबाबदार ठरवले आहे. लपून छपून दगडफेक करणारे काँग्रेस कार्यकर्ते हे भाजपसमोर दुबळे आहेत, असे शिवराजसिंह यांनी म्हटले आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह म्हणाले की, चूरहटमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या बसवर झालेली दगडफेक दुर्दैवी घटना आहे. या भ्याड कृत्याचा जनता निषेध करेल आणि आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला धडा शिकवेल.