“मतांच्या लाचारीसाठी शिवसेनेला हिंदूत्वविरोधी पक्षांना साथ द्यावी लागतेय”

85

मुंबई, दि.०३ (पीसीबी) : मतांच्या लाचारीसाठी शिवसेनेला हिंदूत्वविरोधी पक्षांना साथ द्यावी लागत असून खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशात भाजपविरोधात काँग्रेसला वगळूनच आघाडी करायची आहे. पण महाराष्ट्रात सरकारमध्ये काँग्रेस असल्याने त्यांची अडचण झाल्याचा दावाही फडणवीस यांनी केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा हा उद्योगपतींशी चर्चा करण्यापेक्षा भाजपविरोधी पक्षांची आघाडी उभारण्याच्या राजकीय कारणांसाठीच होता. उद्योगांचे केवळ कारण होते, असा आरोप करुन फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरोधी आघाडी उभारण्याचा देशभरातील विरोधी पक्षांनी २०१९ मध्ये प्रयत्न केला होता. पण तरीही केंद्रात भाजपचे सरकार आले. आताही तेच होईल व २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत येईल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे स्वा. सावरकरांचे प्रेम बेगडी असून त्यांचे खासदारही बेतालपणे वक्तव्ये करीत आहेत व त्यांचा अपमान करीत आहेत. स्वा. सावरकरांना भारतरत्न देऊ नका, पण किमान योग्य सन्मान ठेवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.