मतपेटीवर डोळा ठेवून भाजपाने गोपाळ शेट्टींना माफी मागायला लावली- उद्धव ठाकरे

77

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ख्रिश्चनांनी सहभाग घेतला नव्हता असे वक्तव्य केले होते. तसेच भारताला हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्र लढा देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले असेही त्यांनी म्हटले होते. ख्रिश्चनांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गोपाळ शेट्टींना माफी मागावी लागली. त्यांनी सुरूवातीला राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती. मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यावर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. आता गोपाळ शेट्टी यांची बाजू घेत शिवसेनेने भाजपावर टीकेचे ताशेरे झाडले आहेत. ख्रिश्चन समाजाच्या मतपेटीवर डोळा ठेवून भाजपाने गोपाळ शेट्टींना माफी मागायला लावली असाही आरोप शिवसेनेने केला आहे.

गोपाळ शेट्टींना भाजपाने माफी मागायला लावली त्यामुळे भाजपाचा निधर्मी चेहेरा समोर आला आहे अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे. ख्रिश्चनांबाबत गोपाळ शेट्टी यांनी जे वक्तव्य केले त्यात त्यांचे काय चुकले? त्यांच्या वक्तव्यामुळे ख्रिश्चन समाज जेवढा भडकला नसेल तेवढे आपले विविध राजकीय पक्षांचे झगेवाले भडकले आहेत अशीही टीका सामनातून करण्यात आली आहे.